(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला आणखी एक यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हेरॉईनसदृश अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. तपासात हे अमली पदार्थ मुंबईतून रत्नागिरीत आणल्याचे निष्पन्न होत असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना गाठण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ३० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताहिर रफिक कोतवडेकर (रा. थिबा पॅलेस रोड), रिझचान अश्रफ नावडे (रा. राजीवडा), आकिब जिक्रिया वरता (रा. राजीवडा) आणि रफत करीम फणसीमकर (रा. राजीवडा) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजा, चरस तसेच विविध प्रकारच्या पावडर स्वरूपातील अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींवर प्रभावी कारवाया केल्या आहेत.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्यासह पोलिस हवालदार शांताराम झोरे, विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.
दरम्यान, जप्त अमली पदार्थांची मुंबईशी असलेली साखळी उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

