( पुणे )
नाना पेठेतील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह सर्व १३ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांच्या हाती न लागलेला कृष्णा आंदेकर अखेर स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे.
कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (४०, रा. नाना पेठ) हा या खुनातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. समर्थ पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी तो हजर झाला. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर (१७) हा लहान भावाला क्लासवरून आणून सोसायटीत दुचाकी लावत असताना टोळीने त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा खून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
यापूर्वी झालेल्या अटक आणि ठिकाण
बुलढाणा (मेहकर) : आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू अण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार वाडेकर (२७), स्वराज वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी वाडेकर (४०) यांच्यासह काही साथीदारांना अटक.
गुजरात (द्वारका सीमा) : शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक आंदेकर (२१), शिवराज आंदेकर (२९) व माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर (६०) यांना अटक.
पुणे : अमन पठाण (२५), यश पाटील (१९), अमित पाटोळे (१९) व सुजल मेरगु (२०) यांना अटक.
या सर्वांना अटक झाल्यानंतर केवळ कृष्णा आंदेकर पोलिसांच्या तावडीत नव्हता. परंतु इतर आरोपी पकडल्याने त्याने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

