(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. फेब्रुवारी–मार्च 2025 मध्ये झालेल्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार आढळलेल्या परीक्षा केंद्रांवर कठोर पावले उचलण्यात आली असून राज्यभरातील दहावीची 31 आणि बारावीची 76 अशी एकूण 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरातील 34 परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांनी भेट देऊन तपासणी केली असता कॉपी आणि इतर गैरप्रकार उघडकीस आले. त्यानंतर कारवाई करत पुणे विभागातील 7, नागपूर विभागातील 6, छत्रपती संभाजीनगर विभागातील 10, मुंबई विभागातील 1 आणि लातूर विभागातील 7 अशा एकूण 31 दहावीच्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती विभागातील एकाही केंद्रावर गैरप्रकार आढळून आले नाहीत.
बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या 76 परीक्षा केंद्रांवरही अशीच कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान ज्या केंद्रांवर भरारी पथकाने भेट देऊन कॉपी प्रकरणे आणि इतर गैरप्रकार उघडकीस आणले, त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेत शिस्त आणण्यास मदत होणार असून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

