( साखरपा / भरत माने )
आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे निश्चिम सेवा देणाऱ्या साखरपातील आरोग्य सेविका सेवा देणाऱ्या व “सावंत बाई” म्हणून परिचित असलेल्या सुनंदा महादेव सावंत (अन्नी कांबळे) यांचा ७५ वा वाढदिवस कोंडगाव येथील नानासाहेब शेट्ये हॉल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी मंडळ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सुनंदा सावंत यांचा जन्म ५ जून १९५० रोजी आंबेशेत येथे झाला. वडिलांचे बालवयात निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली. परिस्थितीशी झुंज देत त्यांनी विणकाम, सुपे वळणे अशा कामांद्वारे कुटुंबाला आधार दिला. त्यानंतर पोलीस व विविध सरकारी भरती प्रक्रियेत भाग घेत अखेर २० व्या वर्षी दाभोळ-दापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
पाच वर्षांनंतर १९७८ साली साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची बदली झाली आणि त्यांच्या सेवेला एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केली असून, एक हजारहून अधिक प्रसूती त्यांच्या हस्ते पार पडल्या आहेत. त्यांच्या निःस्वार्थ आणि समर्पित सेवेसाठी शासनाकडून त्यांना “आदर्श कर्मचारी” म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचा विवाह पशुवैद्यकीय खात्यातील अधिकारी देवाजी कांबळे यांच्याशी झाला. त्यांनी आपल्या मुलांनाही मेहनती आणि समाजसेवक बनवले. मोठा मुलगा प्रशांत कांबळे आरोग्य विभागात, दुसरा मुलगा बंधू कांबळे हे यशस्वी उद्योजक आहेत, तर मुलगी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
२०१० साली निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग कायम ठेवला. वाढदिवसाच्या निमित्ताने गुळाच्या ढेपेनी त्यांची तुला करण्यात आली, उपस्थित नागरिकांना झाडांची रोपे, तर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले. बापू शेट्ये, आबा सावंत, श्रीधर कबनूरकर, प्रताप सावंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मनोगतातून सावंत बाईंना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.