१४ जानेवारी १८२८ रोजी रत्नागिरी येथे ‘कोकण बुक सोसायटी’ या नावाने या संस्थेची स्थापना झाली. १४ जानेवारी २०२६ रोजी या वाचनालयाच्या स्थापनेला १९८ वर्षे पूर्ण होत आहेत. रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा हा मानबिंदू आजही तेवढ्याच तेजस्वीपणे उभा आहे.
१९८ वर्षांची साथ लाभलेल्या या वाचनालयाने रत्नागिरीचा सुसंस्कृत आणि ग्रंथप्रेमी चेहरा केवळ जपला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. पिढ्यानपिढ्या ज्ञानाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवण्याचे काम या वाचनालयाने निष्ठेने केले आहे.
कोणतेही स्थिर आर्थिक भांडवल नसताना, केवळ जनाश्रयाच्या बळावर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने १९८ वर्षे अखंड ग्रंथसेवा केली आहे. समाजमनाशी नाळ जोडलेली असल्यामुळेच ही संस्था इतका प्रदीर्घ प्रवास करू शकली. वाचनाचे महत्त्व ओळखणाऱ्या अनेक पिढ्यांनी येथे ग्रंथसंपदेतून ज्ञान घेतले, संस्कार आत्मसात केले आणि ते रत्नागिरीच्या मातीत रुजवत गेले. त्यामुळेच हे वाचनालय आजही तितकेच सजीव आणि प्रेरणादायी आहे.
ग्रंथसंपदेच्या दृष्टीने हे वाचनमंदिर अत्यंत समृद्ध आहे. चोखंदळ वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन दुर्मिळ आणि मौल्यवान ग्रंथ या दालनात जपले गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि ग्रंथसंपदेने परिपूर्ण असे हे वाचनालय ‘दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते.
जे. एच. टॉर्ट, न्यायमूर्ती खारेघाट, स्वामी स्वरूपानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महनीय व्यक्तिमत्त्वांचा या वाचनालयाच्या वाटचालीत सहभाग राहिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत रत्नागिरीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक प्रवाहांशी हे वाचनालय सतत जोडलेले राहिले आहे. बदलत्या शासनव्यवस्था, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला सामोरे जात परिस्थितीशी जुळवून घेत या संस्थेने आपला प्रवास अखंड सुरू ठेवला.
१९८ वा वर्धापन दिन विशेष महत्त्वाचा ठरतो, कारण याच वर्षी वाचनालयाला नवी, प्रशस्त, सुशोभित आणि अद्ययावत वास्तू लाभली आहे. आता पुढील एका शतकाच्या प्रवासासाठी वाचनालय स्वतःच्या सुसज्ज संकुलासह सज्ज झाले आहे. वाचनाची परंपरा नव्या पिढीकडे आधुनिक व्यवस्थेसह सुपूर्त होत आहे.
नव्या इमारतीत शांत, प्रसन्न वातावरण, भरपूर प्रकाश, समृद्ध ग्रंथसंपदा आणि ग्रंथांसाठी स्वतंत्र भव्य विभाग उपलब्ध आहे. सुमारे २००० चौ. फूट क्षेत्रफळाचा स्वतंत्र ग्रंथविभाग आणि त्यातील बहुविध साहित्य वाचनालयाच्या वैभवात भर घालत आहे. वाचकांचे प्रेम आणि सहवास यामुळे या वाचनमंदिराचे सौंदर्य अधिक खुलत आहे.
आज १९८ वर्षांचा टप्पा गाठताना हे वाचनालय केवळ ग्रंथालय न राहता ज्ञानसंगमाचे केंद्र बनले आहे. येत्या दोन वर्षांत अत्याधुनिक सभागृह, आंतरराष्ट्रीय डिजिटल लायब्ररींशी जोडलेली डिजिटल लायब्ररी, डिजिटायझेशन प्रकल्प, उत्तम अभ्यासिका, विविध कलाविष्कारांसाठी दालन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कम्युनिटी हॉल अशा उपक्रमांद्वारे रत्नागिरीतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख अधिक दृढ करण्याचा संकल्प वाचनालयाने केला आहे.
रत्नागिरीतील सुजाण नागरिकांनी वर्गणीदार वाचक सभासद म्हणून या पुरातन ज्ञानमंदिराशी जोडले जावे आणि येथे नियमितपणे येत राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. हे वाचनमंदिर नित्य नव्या उत्साहाने प्रत्येक वाचनप्रेमीचे स्वागत करण्यास सदैव तत्पर आहे.
या पुरातन आणि गौरवशाली वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वाचनप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.
– अॅड. दीपक पटवर्धन
अध्यक्ष
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय,

