(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्याच्या कलाविश्वात अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. कारवांचीवाडी येथील स्व-शिक्षित तरुण कलाकार ओमकार भातडे याची ‘कलारंग’ या डिजिटल कलाव्यासपीठावर सादर होणाऱ्या “कला-टॉक्स” या सर्जनशील मुलाखत मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
ओमकार सध्या रत्नागिरी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून घरच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार करून त्याने व्यावसायिक शिक्षणाची दिशा स्वीकारली आहे. मात्र लहानपणापासून मनात रुजलेली कला हीच त्याची खरी ओळख ठरली आहे. रेषा, रंग आणि कॅनव्हास यांच्याशी असलेले नाते त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे.
संवादादरम्यान ओमकार म्हणाला की, कुटुंबासाठी उभा राहण्याची जबाबदारी मोठी आहे, पण कला नसेल तर आयुष्य अपूर्ण वाटते. त्याच्या चित्रांमध्ये बारकाईचे निरीक्षण, भावना आणि कल्पनाशक्तीचा समतोल प्रत्ययास येतो.
उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ‘कलारंग’ हे डिजिटल माध्यम असून ओमकारची जिद्द, चिकाटी आणि कलात्मक जाण पाहून त्याची कहाणी ‘कला-टॉक्स’साठी निवडण्यात आली आहे. “परिस्थितीशी झुंज देत स्वतःची वाट शोधणारे कलाकार हेच कलारंगचे खरे प्रेरणास्थान आहेत,” असे कलारंगचे संस्थापक आर्किटेक्ट अनिकेत सक्रे यांनी यावेळी सांगितले.
या विशेष भागात ओमकारची प्रेरणा, त्याचा संघर्ष आणि भविष्यातील स्वप्ने कलारसिकांसमोर उलगडली जाणार आहेत. लवकरच हा ‘कला-टॉक्स’चा भाग कलारंगच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात येणार आहे.
ओमकार भातडेसह कारवांची वाडी परिसरासाठी ही घटना अभिमानाची ठरणार असून, जिद्द आणि कलेची सांगड घालणारी ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी नवी प्रेरणा ठरणार आहे.

