(दापोली)
दापोली नगरपंचायतीत सत्तांतराच्या हालचालींनी राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेत केलेल्या प्रवेशामुळे नगराध्यक्ष ममता मोरे यांचे बहुमत धोक्यात आले असून, त्यांना पदावरून हटवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासंदर्भात शिंदेसेना समर्थक नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला असून, या अर्जावर आज ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.
ममता मोरे यांना सुरुवातीला अडीच वर्षांची नगराध्यक्षपदाची मुदत मिळाली होती. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार सर्व नगराध्यक्षांना पाच वर्षांची मुदतवाढ मिळाल्यामुळे त्या अधिक काळ पदावर राहिल्या. पण राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये झालेले बदल दापोलीच्या राजकारणावरही प्रभाव टाकताना दिसत आहेत. उद्धवसेनेतील बहुतेक नगरसेवकांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतल्यामुळे आता ममता मोरे या एकमेव उद्धवसेना नगरसेवक उरल्या आहेत.
नगरपंचायतीतील बहुमत गमावल्याने ममता मोरे यांच्यावर दबाव वाढला असून, त्यांना बाजूला करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याचे सूत्रांकडून समजते. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील सुनावणीसाठी दापोली उपविभागीय अधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला ही बैठक २ मे रोजी नियोजित होती, मात्र सुटीच्या कारणास्तव ती आज रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.
सर्व नगरसेवकांचा कल ममता मोरे यांच्या विरोधात गेल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण दापोलीचे लक्ष लागले आहे.

