(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, तक्रार निवारण आणि तात्काळ मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रतिसाद’ हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
नागरिक-केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाकडून विविध मिशन आणि डिजिटल उपक्रम राबवले जात असून ‘मिशन प्रतिसाद’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश एकटे राहणारे, दुर्गम भागात वास्तव्यास असलेले आणि मदतीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक यांना तात्काळ पोलीस सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी 9684708316 आणि 8390929100 असे दोन स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. या क्रमांकांवर तसेच डायल 112 वर प्राप्त होणाऱ्या तक्रारी ‘मिशन प्रतिसाद’च्या स्वतंत्र कक्षामार्फत तात्काळ नोंदवल्या जातात. यासाठी चार पोलीस अंमलदारांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.
तक्रार प्राप्त होताच संबंधित माहिती त्वरित त्या हद्दीतील पोलीस ठाण्याला कळवली जाते. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार प्रत्यक्ष तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन समस्येचे तात्काळ निरसन करतात. तक्रार सोडवल्यानंतर समाधान झाले आहे की नाही, याची पुन्हा खात्री करून घेतल्यानंतरच संबंधित तक्रार बंद करण्यात येते.
मिशन प्रतिसाद अंतर्गत प्राप्त सर्व तक्रारींची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवली जाते. ही माहिती दररोज अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी आणि पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या समोर सादर केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी थेट फोनवर संवाद साधून समाधानाची खात्री करून घेत आहेत.
आतापर्यंत मिशन प्रतिसाद अंतर्गत एकूण 203 ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये घरगुती वाद, मारहाण व शिवीगाळ, आर्थिक फसवणूक, शिधा न मिळणे, ध्वनी प्रदूषण, अपघातावेळी मदत न मिळणे, आजारपणातील सहाय्य अशा विविध बाबींचा समावेश आहे. या सर्व तक्रारींचे 100 टक्के प्रभावी निरसन करण्यात आले आहे.
दुर्गम व कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम या उपक्रमामुळे शक्य झाले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही अडचण असल्यास त्यांनी ‘मिशन प्रतिसाद’च्या हेल्पलाइन क्रमांकांचा निर्भयपणे वापर करावा.
ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोलीस मदत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल कटिबद्ध असून, या उपक्रमात कोणतीही अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

