(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील ज्येष्ठ समाजसेवक, माजी सरपंच व पोलिसपाटील कै.श्री.नारायण शिवराम सावंत. वय – ९२ वर्षे, यांचे आज दिनांक – १३ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे आज दिनांक १३/०१/२०२६ रोजी करण्यात आले. शासकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे हे १६ वे मरणोत्तर देहदान ठरले आहे.
कै. श्री. सावंत यांच्या पश्चात त्यांचे पुतणे श्री.प्रफुल्ल सावंत व श्री. महेश सावंत आहेत.
कै.नारायण सावंत यांनी नाणीज ग्रामपंचायत येथे २५ वर्षे सरपंच व २५ वर्षं पोलिस पाटील म्हणून सेवा दिली तसेच समाजसेवेसाठी आपल्या जीवनातील मोठा काळ समाजासाठी दिला. त्याशिवाय २६ वर्षे गावप्रमुख, नाणीज पंचक्रोशीत गरजुंना मोफत वैद्यकीय सेवा दिली, जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोडीलिपी भाषांतर करून देण्यासाठी विनामोबदला काम करत होते व ग्रामपंचायत प्रशासक म्हणून काम करताना महाराष्ट्र राज्यातील पहिल गाव म्हणून नाणीज ग्रामपंचायत येथे घरकुल योजना व कुटुंब कल्याण योजना तसेच शासकीय नळपाणी योजना शासनामार्फत प्रभावीपणे राबविल्या आणि याच कामाची दखल म्हणून त्यांना शासनाकडून विशेष पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे.
सदर मरणोत्तर देहदान वेळी नाणीज पोलिस पाटील श्री. नितीन कांबळे, संदिप सरफरे, श्रीकांत सावंत, अशोक सावंत, गणेश सावंत,गणपत गुरव, संदेश सावंत,अशोक सावंत,प्रविण सुर्वे, विशाल सरफरे, विकास सरफरे, मकरंद सावंत,सावंत खेडशी, सुर्यकांत सावंत व एम.बी.कांबळे हे सर्व उपस्थित होते.
सदर देहदान प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री.रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर,राज पेडणेकर, मिहिर लोंढे यांनी काम पाहिले.

