(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील कै. श्रीधर कृष्णा पेटकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धेत देवश्री सामंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
नटराज पूजन आणि श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत प्रचिती पातये द्वितीय, तीर्था पावसकर तृतीय, तसेच अनुश्री हरचकर आणि आर्यन चौगुले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पहिल्या तीन क्रमांकांना रुपये पंधराशे, तेराशे, अकराशे तसेच उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. सुहास पेटकर यांनी वडील कै. श्रीधर कृष्णा पेटकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा प्रायोजित केली होती.
सदर स्पर्धेत एकूण 18 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पावस केंद्रावरून प्रथम तीन क्रमांक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पावस विभागाने या स्पर्धेत बाजी मारली. अजित पाटील आणि विनय घोसाळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे ही स्पर्धा मालगुंड, पावस, जाकादेवी, या केंद्रावर घेण्यात येईल त्यानंतर अंतिम फेरी बसणी या ठिकाणी घेण्यात येईल असे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पेटकर, श्रीनिवास जोशी, प्रकाश सोहनी, प्रकाश लोगडे, जयवंत कदम, योगिनी सोहनी, प्रिया बंदरकर, राजश्री सुर्वे, श्वेता पाटील, सायली गावडे, जगदीश पाटील संतोष नेवरेकर आणि श्रीकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

