( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरानजीक नाचणे रोडला जोडणाऱ्या विश्वनगर भागात काल दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या स्कॉर्पिओ कारने भीषण अपघात घडवला. गाडीचा ताबा सुटल्याने ती थेट झाडावर जाऊन धडकली. या भीषण धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि क्षणात घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
दरम्यान, अपघातग्रस्त स्कॉर्पिओने एका दुचाकीला देखील धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर केवळ काही मिनिटांतच क्रेन बोलावून गाडी बाजूला करण्यात आली. या सर्व प्रकाराचे घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले होते. मात्र याच ठिकाणी खरा कहर झाला. कारण काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांकडून मोबाईल हिसकावून घेऊन मोबाईलमधील अपघाताचे व्हिडिओ व फोटो डिलिट केल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अपघाताच्या घटनेला झाकून टाकण्याचा आटापिटा इतका झाला की थेट नागरिकांच्या मोबाईलमधून फोटो-व्हिडीओ डिलिट करण्यापर्यंत स्थानिक पुढाऱ्यांची मजल गेली.
हा अपघात घडवणारी स्कॉर्पिओ एका प्रभावी राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकाची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. हा प्रभावी नेता नेमका कोण हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताची गाडी कोणाची होती? दबाव टाकणारे पुढारी कोण होते? आणि महत्वाचे म्हणजे, लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसाचा आवाज दाबण्याची ही हिंमत आलीच कशी? असे गंभीर सवाल उपस्थित होत आहे. घटनास्थळावरून अनेकांनी व्हिडिओ काढून ठेवले होते. मात्र ते पुरावेच पुसून टाकण्यात आल्याने अपघाताचा तपास कुठे वळणार, याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे.
आज नागरिकांच्या मोबाईलमधून व्हिडीओ डिलिट केले, उद्या….
परंतु एवढा मोठा अपघात घडूनसुद्धा पोलिसांपर्यंत त्याची अधिकृत माहिती पोहोचली नाही, हे देखील तितकेच चिंताजनक आहे. सामान्य नागरिकाला अपघाताच्या घटनेची माहिती जगासमोर मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिसकावणे म्हणजे हुकूमशाहीच. खरे तर प्रश्न अपघाताचा नाही, प्रश्न आहे “सत्य दडपण्याचा” आज नागरिकांच्या मोबाईलमधून व्हिडीओ डिलिट केले, उद्या एखाद्याचा जीव गेला तरी पुरावे नष्ट करून त्यावर पडदा टाकला जाणार का? असे प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली नाहीत, तर नाचणे, विश्वनगर भागात हा अपघात केवळ अपघात न ठरता सत्य दडपण्याचा राजकीय कट ठरेल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
….प्रत्यक्षात सत्याचा गळा घोटण्याचा हा प्रकार
तिथे उपस्थित असलेले पुढारी कोणाच्या छत्रछायेखाली काम करतात? कोणत्या राजकीय आशीर्वादामुळे त्यांचा इतका दरारा की सामान्य माणसाचे हक्कच पायदळी तुडवले जात आहेत? पोलिस यंत्रणा मौन का बाळगून बसली आहे? अपघाताचा तपास करणे हे त्यांचे कर्तव्य नाही का मोबाईलमधील फोटो-व्हिडीओ डिलिट करणे म्हणजे प्रत्यक्षात सत्याचा गळा घोटण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. पुरावे पुसून टाकल्याने अपघात घडला नाही असा भास निर्माण होतो का? की “ज्यांच्याशी सत्ता आहे, त्यांना कायदा लागू होत नाही” असा संदेश द्यायचा होता?
(बातमी अपडेट होत राहील)

