(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील खारभूमी मैदानावर महावितरण खात्याच्या वतीने महावितरण संघ मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘महावितरण चॅम्पियन चषक’ या नावाने ही स्पर्धा रविवारी१२ जानेवारी रोजी एकदिवसीय कालावधीत खेळविण्यात आली. यावेळी या स्पर्धेचा अंतिम सामना कोतवडे शाखा विरुद्ध मालगुंड शाखेचा संघ यांच्यामध्ये खेळविला गेला.
या अंतिम सामन्यांमध्ये कोतवडे शाखेच्या संघाने या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. तर मालगुंड शाखेच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी अंतिम सामन्यामध्ये कोतवडे शाखेच्या संघाने निर्धारित चार षटकांमध्ये 53 धावा करून 54 धावांचे उद्दिष्ट मालगुंड शाखेच्या संघासमोर ठेवले होते. परंतु निर्धारित चार षटकांमध्ये मालगुंड शाखेने 34 धावसंख्या केली.
या अंतिम सामन्यात कोतवडे संघाकडून अजय कांबळे व नंदू आयरे यांनी सुरेख फलंदाजी करून नाबाद 53 धावा केल्या. या महावितरण चॅम्पियन चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. या तिसऱ्या वर्षांमध्ये कोतवडे संघाने दुसऱ्यांदा विजेता चषकावर नाव कोरले तर मालगुंड संघाने देखील दुसऱ्या वेळी उपविजेता चषकावर नाव कोरले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महावितरणचे शाखा अधिकारी व उपविभागातील अधिकारी त्याच बरोबर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.