( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरत प्रस्थापितांच्या विरोधात शंडू ठोकणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात नेहमीच विविध अठरा पगड जाती धर्माच्या उमेदवारांना संधी दिलेली आहे. यातच रत्नागिरी दक्षिण भागात विधानसभेच्या तिन्ही जागांवर उमेदवार उतरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत दहा मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ३० नवीन उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात विविध जाती-जमातींचे प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत वंचितने एकूण ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत उमेदवारांच्या नावांसह त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे, ज्यामुळे सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यात आला आहे. रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात देखील परिवर्तनवादी मतदार मोठ्या संख्येने आहे. दक्षिण जिल्ह्यात सध्या लांजातून शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी, चिपळूणमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम , तर रत्नागिरीतून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत असे तीन आमदार आहेत. यातील उदय सामंत हे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात सामील झाले. तर शेखर निकम राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सामील झाले. राजन साळवी हे ठाकरे गटात कायम आहेत. परंतु या तिन्ही आमदारांविरोधात त्यांच्याच मतदारसंघात नाराजीचा सुर मोठा प्रमाणात आहे. या प्रस्थपितांना शह देण्यासाठी ॲड प्रकाश आंबेडकर हे आपले मोहरे उतरवणारण्याची शक्यता आहे. यासाठी महत्वाचे जिल्हा कमिटीवरील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढत आहे. तसेच अजूनही कोणी इच्छुक असल्यास येत्या 4 दिवसात संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा महासचिव मुकुंद सावंत यांनी केले आहे.
रत्नागिरी विधानसभेच्या जागेवर कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार देणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अशातच आता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात नाराजीचा सूर पाहून तसेच भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, अशा धनदांडग्या पक्षाकडून उमेदवार कोण या चर्चाकडे दुर्लक्षित करून वंचित बहुजन आघाडीकडून रत्नागिरीकरांना सक्षम पर्याय तसेच कोणाच्याही आमिषाला बळी न पडणारा असा तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. तिन्ही मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अधिकृत घोषणा झाल्यावर कळणार आहेत. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मोहरे कोण? या विषयावर आता राजकीय आखाड्यात चर्चा देखील रंगत आहे. एकूणच यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात चुरशीची लढत रंगणार असल्याचे आतापासूनच चित्र दिसून येत आहे.