(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा सध्या वाळू माफियांचा अड्डा बनला आहे की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या अंधारात चार ते पाच संशयास्पद बोटी समुद्रात उभ्या राहत असून, दहा ते पंधरा जण खुलेआम बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार प्रत्यक्ष पाहूनही प्रशासनाकडून कोणतीही तात्काळ कारवाई न झाल्याने संशय अधिकच बळावला आहे.
माजी पोलीस पाटील शामसुंदर गवाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कासव अंडी घालण्यासाठी येतात का, याची पाहणी करण्यासाठी माडबन समुद्रकिनारी गेले असता समुद्रात चार ते पाच बोटी संशयास्पदरीत्या उभ्या असल्याचे दिसून आल्या. किनाऱ्यावर दहा ते पंधरा लोक मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत होते. हा प्रकार इतका निर्धास्तपणे सुरू होता की, कायद्याची कोणतीही भीती त्यांना नसल्याचे स्पष्ट दिसून आले.
आपण एकटे असल्याने त्यांनी तात्काळ गावात येऊन दहा ते बारा ग्रामस्थांना सोबत घेत पुन्हा समुद्रकिनारी धाव घेतली. मात्र ग्रामस्थ जवळ येत असल्याची चाहूल लागताच संबंधित सर्वजण बोटी घेऊन समुद्रात पसार झाले. म्हणजेच, हे लोक कोण साधेसुधे नव्हते, तर कारवाईची पूर्ण पूर्वतयारी असलेले टोळके असल्याचे स्पष्ट होते.
या प्रकाराची माहिती तात्काळ गावचे पोलीस पाटील यांना देऊन शासकीय यंत्रणेला कळविण्याची विनंती करण्यात आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत ना महसूल विभागाचा अधिकारी घटनास्थळी पोहोचला, ना पोलीस प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली. एवढा गंभीर प्रकार घडूनही यंत्रणा गप्प का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांनी सांगितले की, अशाच संशयास्पद बोटी यापूर्वी विजयदुर्ग जेटी परिसरातही पाहण्यात आल्या होत्या. मग माडबन समुद्रकिनारी रात्री नेमके काय चालते? ही वाळू कुठे नेली जाते? कोणाच्या आशीर्वादाने हा बेकायदेशीर उपसा सुरू आहे? प्रशासनाच्या संरक्षणाशिवाय असा धुडगूस शक्य आहे का, असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहेत.
बेकायदेशीर वाळू उपशामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. कासवांच्या अंडी घालण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. एकीकडे सागरी सुरक्षा, कोस्टल गार्ड, जनजागृती यांचे गाजर दाखवले जाते; मात्र प्रत्यक्षात माफियांसमोर प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर माडबन समुद्रकिनारी दिसलेल्या संशयास्पद बोटींबाबत प्रशासनाने तात्काळ वस्तुस्थिती स्पष्ट करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत. “कायदा सर्वसामान्यांसाठीच आहे का?” असा रोखठोक सवाल आता माडबनमधून उठू लागला आहे.

