(रत्नागिरी)
तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी परिसरात आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (११ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भरत दिगंबर धारगळकर (५५, मूळ रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग; सध्या रा. नाखरे, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रामेश्वरवाडी येथील राजन वैद्य यांच्या मालकीच्या आंबा बागेत फवारणीचे काम सुरू असताना बागेच्या बाहेरील बाजूस अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग काही क्षणांतच भडकून बागेच्या दिशेने वेगाने पसरू लागली. बागेचे मोठे नुकसान होऊ नये, या हेतूने भरत धारगळकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली.

मात्र, आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि दाट धुराच्या विळख्यात ते अडकले. आगीच्या तीव्रतेमुळे ते गंभीररीत्या भाजले गेले, तर धुरामुळे गुदमरून ते जागीच कोसळले. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे, मृत भरत धारगळकर हे बागेचे मालक राजन वैद्य यांच्या पत्नीचे सख्खे भाऊ असल्याने या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात एका कष्टकरी कामगाराने प्राण गमावल्याची ही घटना रामेश्वरवाडी परिसराला हादरवून गेली असून, हळहळ व्यक्त होत आहे.

