(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिशन फिनिक्स अंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला अधिक धार देत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहरात मोठी NDPS कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक शासकीय वाहनाने रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी सिव्हील हॉस्पिटल ते निवखोलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिव्हील हॉस्पिटल कंपाउंड परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत ताहीर रफीक कोतवडेकर (रा. रुबी अपार्टमेंट, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी), रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा, रत्नागिरी), आकीब जिक्रीया वस्ता (रा. राजीवडा, मच्छी मार्केटजवळ, रत्नागिरी) आणि रफत करीम फणसोपकर (रा. जुने मच्छी मार्केट, राजीवडा, रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीदरम्यान ३० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थासह इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आघात बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोहवा. २५१ शांताराम झोरे, पोहवा. ९०९ विजय आंबेकर, पोहवा. १४०७ दिपराज पाटील, पोहवा. २६२ विवेक रसाळ, पोहवा. २६५ योगेश नार्वेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल २१५ अतुल कांबळे यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली.

