(मुंबई)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच राजकीय पक्ष मुंबई जिंकण्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर पार पडली. या सभेत दोन्ही नेत्यांनी भाजप तसेच महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात बाळासाहेब आणि शिवसेनेशी जोडलेल्या लहानपणीच्या आठवणींनी केली. त्यांनी बाळासाहेब तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंब आज इथे उपस्थित असले पाहिजे होते अशी इच्छा व्यक्त केली. तब्बल २० वर्षांनी दोन भाऊ एकत्रित आल्यामुळे पक्षाशी काही एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिटाला मुकावे लागले त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी तयार झाल्यामुळे राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत भाषणाला सुरुवात केली.
सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हिंदीचा वाद हा मराठी माणूस जागा आहे का, हे तपासण्यासाठी उभा करण्यात आला होता. युतीमुळे काहींना उमेदवारी देता आली नाही, काही नाराज झाले, पण कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.” विधानसभेच्या निकालानंतर सध्याचे सरकार लोकांना गृहित धरून वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पुढे आरोप केला की, “६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे मतदारांचा अधिकारच काढून घेतला आहे. उद्या हा आकडा आणखी वाढू शकतो. ड्रग्ज रॅकेटशी संबंधित व्यक्तीला तुळजापूरमध्ये भाजपने तिकीट दिले. बदलापूरच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला नगरसेवक करण्यात आले. ही हिंमत कुठून येते? निवडणूक जिंकण्याचं तंत्र आलं की हा माज वाढतो. अख्खी मुंबई आणि देश विकायला काढला आहे.”
देशातील बंदरे आणि विमानतळ एका उद्योगपतीच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत राज ठाकरे म्हणाले, “पन्नास ते साठ शिवाजी पार्क बसतील एवढी जमीन अदानींना दिली आहे. वाढवण बंदराच्या नावाखाली मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई विमानतळ विकण्याचा डाव आहे आणि मुंबई गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
सभेदरम्यान राज ठाकरे यांनी व्हिडिओ सादर करत 2014 पूर्वी आणि नंतर उद्योगपतींच्या प्रकल्पांतील बदलांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदानी यांचे प्रकल्प आणि अदानींच्या उद्योगांची महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धडकी भरवणारी प्रगती याची पोलखोल राज ठाकरे यांनी या व्हिडिओत केली. अख्खी मुंबई यांनी विकायला काढली, 2024 नंतर विधानसभा निवडणुकीनंतर मला हे समजायला लागले. माझ्या रिसर्च टीमने हा व्हिडिओ बनवला. राज ठाकरे यांनी व्हिडिओमध्ये भारताचा एक मॅप दाखवला. 2014 मध्ये गौतम अदानीचे किती प्रकल्प होते आता 2025 मध्ये अदानी यांचे प्रकल्प किती आहेत याची प्रत्येक विभागानुसार प्रगती या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली.
“अख्खी मुंबई विकायला काढली आहे. हे सर्व पाहूनही भीती वाटत नसेल, तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असा इशाराही त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, “आमच्या वचननाम्यात आम्ही शहर सुधारण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठी माणसाची किंमत इथे कळते, पण तोच मराठी माणूस विकला जातोय. आज जर चुकलात, तर मुकलात. ही निवडणूक मराठी माणसांसाठी निर्णायक आहे. मुंबई गेली, तर उभ्या असलेल्या पुतळ्यांनाही अर्थ उरणार नाही” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा, तर हजार रुपये देतो. मला त्यांचा चोरीचा पैसा नको. पण मी तुम्हाला आवाहन करतो की, मोदींपासून तुमच्यापर्यंत, तुमच्या चेल्या-चंपाट्यांपर्यंत, अगदी वर्गातल्या मॉनिटरच्या निवडणुकीतसुद्धा हिंदू-मुस्लिम न करता केलेलं एक भाषण दाखवा. आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देऊ,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “अहो मेवाभाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवणार? सध्या सगळीकडे अडानीकरण सुरू आहे. मुंबादेवीवरून मुंबईचं नाव पडलं, आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव सुरू आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी एकजुटीचा संदेश देताना सांगितले की, “आज भावकी एक झाली आहे, गावकी एकत्र येते आहे. काही जण विचारत होते की ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्मालाच आलेलं नाही. आम्ही मराठीसाठी एकत्र आलो आहोत. आमच्यातले वाद गाडून आम्ही मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एकत्र आलो आहोत,” अशी गर्जना त्यांनी केली.
या सभेत ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका करत आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संयुक्त सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

