(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ८४२ ग्रामपंचायतींपैकी राज्यस्तरीय बाल संसदेसाठी निवड झालेल्या केवळ तीन ग्रामपंचायतींमध्ये लांजा तालुक्यातील कुर्णे ग्रामपंचायतीने स्थान मिळवले आहे. या ग्रामपंचायतीची बालसरपंच म्हणून निवड झालेल्या कु. आराध्या अमर खामकर हिने आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवत राज्यस्तरीय बाल संसदेत दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी मिळवली आहे. तिची कोकण विभागाच्या बाल उपमुख्यमंत्रीपदी तसेच पर्यावरणमंत्रीपदी निवड झाली असून, या दुहेरी यशामुळे कुर्णे गावासह लांजा तालुक्याचा मान उंचावला आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालदिनाचे औचित्य साधून पुणे येथे राज्यस्तरीय बाल संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतील बालप्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ८४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ तीन ग्रामपंचायतींची या उपक्रमासाठी निवड झाली. त्यात कुर्णे ग्रामपंचायतीचा समावेश असणे ही गावासाठी अभिमानाची बाब ठरली.
या बाल संसदेत आराध्या खामकर हिच्यावर कोकण विभागाच्या बाल उपमुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री या दोन्ही पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. बालवयातच मिळालेली ही दुहेरी संधी तिच्या नेतृत्वक्षमता, आत्मविश्वास आणि गुणवत्तेची दखल घेणारी ठरली आहे. बालकांचे प्रश्न, त्यांचे हक्क, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर बालप्रतिनिधींना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून बालप्रतिनिधींचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमातून बालप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅड. संजय पुराणिक, आयोगाचे सदस्य प्रवीण भुजाडे (अमरावती), विविध जिल्ह्यांतील आयोगाचे सदस्य तसेच यशदा आणि युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.
आराध्याच्या या यशामागे कुर्णे ग्रामपंचायतीचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. ग्रामपंचायत अधिकारी सौ. अनुष्का पडवळ, सरपंच सौ. मानसी माने, ग्रामपंचायत सदस्या तथा आराध्याची आई सौ. आकांक्षा खामकर, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले.
कुर्णेसारख्या छोट्या गावातील मुलीने राज्यस्तरीय व्यासपीठावर आपली छाप उमटवत एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी मिळवणे ही उल्लेखनीय कामगिरी आहे. आराध्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्या राज्यस्तरावर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे अधोरेखित झाले आहे. तिच्या या यशाबद्दल कुर्णे ग्रामस्थांसह लांजा तालुक्यातील नागरिक आणि विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


