( चिपळूण )
दिव्यांग सेवा संस्था, चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांगांची वार्षिक सहल मोठ्या उत्साहात शेगाव येथे आयोजित करण्यात आली. या सहलीत एकूण १४२ दिव्यांगांनी सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे तीव्र दिव्यांगत्वामुळे आजवर घराबाहेर न पडलेले अनेक दिव्यांग या सहलीत प्रथमच सहभागी झाले होते.
सहलीसाठी तब्बल २० व्हीलचेअर्सची व्यवस्था करण्यात आली होती.
या सहलीदरम्यान सर्वजण एकमेकांना पूरक सहकार्य करत आपली सहल सुलभ करताना दिसून आले. शेगाव रेल्वे स्थानकावर आगमनापासून ते श्री गजानन महाराजांचे देवदर्शन, आनंद सागर दर्शन आणि परतीच्या प्रवासापर्यंत श्री गजानन महाराज सेवा संस्थान, शेगाव यांनी अतिशय उत्कृष्ट पाहुणचार व व्यवस्थापन केले गेले.
दिव्यांगांच्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जयश्री गिते यांनी सेवा संस्थान आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांग यांच्यात प्रभावी समन्वय साधत दर्जेदार सेवा दिली. तसेच दिव्यांगांनी स्वतःच्या हक्कांसाठी संघटितपणे संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या उपक्रमात दिव्यांग सेवा संस्थेसह आजोळ वृद्धाश्रम ढोक्रवली, आरएचपी फाउंडेशन रत्नागिरी, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजा आणि दिव्यांग संस्था पाजपंढरी यांनी सहकार्य व सहभाग नोंदवला.
आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे हे स्वतः तीव्र दिव्यांग असूनही, त्यांनी सहलीतील तीव्र अस्थिव्यंग दिव्यांगांना व्हीलचेअरचा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले.
दिव्यांग सहलीसाठी चिपळूण नगर परिषदेकडून व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या. रत्नागिरीचे समीर नाकाडे यांच्या नेतृत्वाखाली लौकिक सावंत, हमिद भुस्कुटे, राजेंद्र कदम, संदीप धुमाळी, धनंजय धुमाळी, अय्याज शेख, निलेश पाटेकर, दिनकर मांडवकर आणि विलास भारती यांनी व्हीलचेअरमधून रेल्वेत चढवणे-उतार करणे, देवदर्शन घडवणे आदी जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनबद्ध आणि कुशलतेने पार पाडल्या.
सहलीदरम्यान व शेगाव मुक्कामी दीपक बाईंग, शांताराम लाड, किरण धनावडे, प्रदीप लिंगायत, मयूर जाधव, गणेश चव्हाण, विजया मेस्त्री आणि संपदा गावडे यांनी भजन-कीर्तनातून सहलीत आध्यात्मिक व सांस्कृतिक रंगत आणली.
या सहलीचे संपूर्ण नियोजन अश्विनी भुस्कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दिव्यांग संगिता काजारे यांनी देवदर्शन सहलीसाठी दिव्यांग व त्यांच्या जोडीदारांची नोंदणी, रेल्वे आरक्षण, तसेच दिव्यांगत्वानुसार बर्थ उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.
ही सहल यशस्वी होण्यासाठी दिव्यांग सेवा संस्थेच्या अध्यक्ष भारती निलेश पाटेकर, सचिव अशोक विठ्ठल भुस्कुटे, गौरी कांबळे, तसेच आजोळ वृद्धाश्रमचे मानसी व माधव सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

