(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तब्बल ३५ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात लग्नसराईला पुन्हा सुरुवात झाल्याने भाजीपाल्याच्या बाजारात चैतन्य परतले आहे. विवाहसोहळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे भाजीपाला, कांदा-बटाटा यांचा खप लक्षणीयरीत्या वाढला असला, तरी गेल्या आठवडाभरात दर मात्र ‘जैसे थे’च असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आहारात पालेभाज्या आणि कोशिंबिरीचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. त्यामुळे मेथी, माठ, पालक यांसह काकडी, गाजर, बीट यांची मागणी वाढली आहे. बाजारात या भाज्यांची मुबलक आवक असल्याने दर नियंत्रणात राहिले आहेत. पावसाळ्याला अवघा महिना शिल्लक असताना ग्राहकांनी साठवणुकीच्या दृष्टीने कांदा आणि लसूण खरेदीस सुरुवात केली आहे. कांदा किरकोळ बाजारात २० ते २२ रुपये किलो, तर घाऊक बाजारात १३ ते १४ रुपये किलो दराने विकला जात आहे. लसूण मात्र १८० ते २०० रुपये किलो दराने विक्रीत आहे. बटाट्याचे टिकाऊपण कमी असल्याने ग्राहक गरजेपुरतीच खरेदी करत असून, सध्या १०० रुपयांत ४ ते ५ किलो असा दर आहे. बहुतांश भाज्यांचे दर २५ ते ३० रुपये पाव किलोच्या आसपास असून, पालेभाज्या २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विकल्या जात आहेत.
टोमॅटोचे दर स्थिर
गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. घाऊक बाजारात २० रुपये, तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलो दर कायम आहे. मार्च महिन्यात वाढलेले दर एप्रिलमध्ये नियंत्रणात आले असून, उत्पादन वाढल्याने आवकही समाधानकारक आहे.
गावठी भाज्यांना पसंती
गावठी भाज्यांमध्ये भेंडी, वांगी, वालाच्या शेंगा यांना विशेष मागणी आहे. भेंडी १५ ते २० रुपये जुडी, वांगी सुमारे ६० रुपये किलो, तर वालाच्या शेंगा २० ते २५ रुपये जुडीप्रमाणे विकल्या जात आहेत. ताज्या आणि चविष्ट भाज्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला दिसतो.
उन्हामुळे काकडीला मोठी मागणी
उष्णतेचा पारा चढत असताना काकडी, गाजर, बीट यांचा खप वाढला आहे. विशेषतः कोशिंबिरीसाठी काकडीला अधिक मागणी असून, सध्या ती ५० रुपये किलो दराने विकली जात आहे. बीट ४० रुपये, तर गाजर ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. एकूणच, लग्नसराई आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या खपात वाढ झाली असली, तरी पुरवठा मुबलक असल्याने दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

