(मिरज / वृत्तसंस्था)
मिरज शहरात दोन नशेखोरांनी धिंगाणा घालत एसटी बस अडवून वाहकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन्ही नशेखोरांना पकडून बेदम मारहाण केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन नशेखोरांनी रस्त्यावर उच्छाद मांडत एसटी बस अडवली. बस थांबवल्यानंतर त्यांनी बसमधील वाहकाशी वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेखोरांनी त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले. घटनास्थळी मोठा जमाव जमा झाल्यानंतर जमावाने दोन्ही हल्लेखोरांना पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या एसटी वाहकासह पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही हल्लेखोरांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात डॉ. प्रशांत दोरकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी पोलिस पथकासह मिरज शासकीय रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलिसांकडून करण्यात येत आहे. एसटी बस का अडवण्यात आली, वाहकाशी झालेल्या वादाचे नेमके कारण काय आणि पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करण्यामागे काय कारण होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटना घडली त्या परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींची माहितीही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

