(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गॅसपुरवठा बंद होणार असल्याची भीती दाखवून मदतीच्या बहाण्याने एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरीतील टिळकनगर परिसरात उघडकीस आला आहे. गॅस एजन्सीतून बोलत असल्याचे भासवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲपवर संशयास्पद ॲप्लिकेशन फाइल पाठवून डेबिट कार्डची माहिती भरायला लावली. त्यानंतर संबंधित नागरिकाच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यात आल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राजेंद्र दुंडाप्पा गडवी (वय ६६, रा. बी-विंग, आकांक्षा सोसायटी, टिळकनगर, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.१० ते ५.१५ वाजण्याच्या दरम्यान गडवी यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. आपण महानगर गॅस एजन्सीतून बोलत असल्याचे सांगत, लवकरच त्यांचा गॅसपुरवठा बंद होणार असल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली. तसेच, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने गडवी यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Mahangar Gas Bill Update’ नावाची ॲप्लिकेशन फाइल पाठवली. ही फाइल उघडण्यास सांगून त्यामध्ये डेबिट कार्डची माहिती भरण्यास प्रवृत्त केले. या प्रक्रियेदरम्यान गडवी यांची एकूण २ लाख ७३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासह या आर्थिक फसवणुकीचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नागरिकांनी घ्यावी खबरदारी
गॅसपुरवठा बंद होण्याची भीती दाखवून अनोळखी व्यक्तीने पाठवलेली ॲप्लिकेशन फाइल उघडणे किंवा त्यामध्ये बँकिंगविषयक माहिती भरणे टाळावे. गॅस एजन्सीच्या नावाने फोन आल्यास संबंधित एजन्सीच्या अधिकृत संपर्क क्रमांकावरून खातरजमा करावी. डेबिट कार्डचा तपशील, ओटीपी किंवा बँकिंगविषयक गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये.


