(नवी दिल्ली)
भारताचे नामवंत उद्योगपती आणि वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले. स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत होती. मात्र बुधवारी संध्याकाळी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनाने देशातील उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे. अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत हा दिवस त्यांच्या आयुष्यातील “सर्वात अंधारमय दिवस” असल्याचे म्हटले आहे. वडिलांसमोर मुलाने असे जग सोडून जाऊ नये, असे शब्द त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहेत.
माहितीनुसार, अग्निवेश अग्रवाल एका मित्रासोबत अमेरिकेत स्कीइंगसाठी गेले होते. त्याचवेळी झालेल्या अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
४९ वर्षीय अग्निवेश अग्रवाल हे वेदांता ग्रुपअंतर्गत असलेल्या तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या संचालक मंडळाचे सदस्य होते. अनिल अग्रवाल यांना दोन अपत्ये असून, अग्निवेश हे त्यांचे पुत्र तर प्रिया अग्रवाल या कन्या आहेत. प्रिया अग्रवाल वेदांता समूहाच्या संचालक मंडळावर असून हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म ३ जून १९७६ रोजी पाटणा येथे झाला. त्यांनी अजमेर येथील नामांकित मेयो कॉलेजमधून शिक्षण घेतले. बॉक्सिंग आणि घोडेस्वारीची त्यांना विशेष आवड होती. त्यांनी फुजेराह गोल्ड कंपनीची स्थापना केली होती तसेच हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या अकाली निधनाने उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

