(देवरुख / वार्ताहर)
देवरूख आगाराची देवरूख-करजुवे बस संगमेश्वर बसस्थानकातून आज (शनिवारी) सकाळी ९.१५ वाजता सुटल्यानंतर धावत्या बसवर एका व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत बसच्या मागील बाजूची काच पूर्णपणे फुटली. या घटनेमुळे संगमेश्वर परिसरात खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
संगमेश्वर बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ब्रीजखालून वळत असताना एका व्यक्तीने पाठीमागून धावत्या बसवर दगड भिरकावला. दगड बसच्या मागील बाजूस लागल्याने काच फुटली.
बसवर दगड आदळल्याचा आवाज येताच चालकाने तात्काळ बस थांबवली. त्यानंतर चालकाने खाली उतरून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडले आणि त्याला संगमेश्वर बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात आणले.
या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस संगमेश्वर बसस्थानकात दाखल झाले. या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
धावत्या बसवर अशा प्रकारे दगडफेक झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर होणाऱ्या अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत आहे.


