(ढाका)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 1,400 नागरिकांच्या हत्येप्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने आज (सोमवारी) फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी देशभरात उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत त्यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला. शेख हसीना यांच्या विरोधात सुमारे 8747 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
2024 मधील हिंसक आंदोलनानंतर हसीना यांना देश सोडावा लागला होता. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अत्याचारांमध्ये हत्या आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, हसीना यांनी हे सर्व आरोप ठामपणे नाकारले होते.
या आंदोलनातील हिंसाचारातून उफाळलेल्या स्थितीनंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. एखाद्या माजी पंतप्रधानांवर इतक्या गंभीर गुन्ह्यांबाबत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. इतर आरोपींनाही कडक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.
UN मानवाधिकार तपासकर्त्यांच्या मते, विद्यार्थी आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात 1,400 नागरिकांचा मृत्यू झाला होता. आंदोलनकर्त्यांवर गोळीबाराचे आदेश आणि शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्बहल्ल्याचे आदेश दिल्याचा आरोप हसीना यांच्यावर ठेवण्यात आला होता. हा हल्ला सुनियोजित असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली.
गंभीर आरोप
- शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न, आणि यातनादेखील देण्याचे आरोप आहेत. चार्जशीटनुसार, हसीनाने पोलिस आणि अवामी लीगशी संबंधित शस्त्रसज्ज लोकांना सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी हिंसाचार वाढवला आणि तो रोखण्यात अपयशी ठरले.
- शिक्षणार्थी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी हसीनाने घातक शस्त्र, हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरण्याचा आदेश दिला.
- 16 जुलै रोजी बेगम रौकेया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांपैकी अबू सैयद यांची हत्या झाली. आरोप आहे, की हसीना आणि इतरांनी या हत्येचे आदेश दिले, कट रचला आणि या अपराधात सहभागी झाले.
- 5ऑगस्ट रोजी ढाका येथील चांखारपुल येथे 6 आंदोलकांची हत्या करण्यात आली. ही हत्या हसीनाच्या थेट आदेशांमुळे, चिथावल्यामुळे, मदत आणि कटकरास्थानामुळे झाली.
- या प्रकरणात, 5 आंदोलकांना गोळ्या घालून मारण्यात आले आणि एक जखमी झाला. या 5 मृत नाकरिकांच्या मृतदेह परस्पर जाळण्यात आले. एकाला तर जिवंत जाळले.
या निकालानंतर बांगलादेशमध्ये मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

