(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करून स्वतःच्या जीविताची सुरक्षा करावी, तसेच परिवहन कायद्यांतर्गत सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
परिवहन कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली नाचणी रोड मार्गे मारुती मंदिर, जयस्तंभ ते मिरकर वाडा आणि पुन्हा नाचणी रोडमार्गे परिवहन कार्यालय येथे समाप्त झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून गेलेल्या या रॅलीमुळे नागरिकांचे लक्ष रस्ता सुरक्षेकडे वेधले गेले. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी हेल्मेट वापराचे महत्त्व अधोरेखित करताना रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी हेल्मेट अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, ऋषिकेश कोराने, गजानन कुळी, केतन पाटील तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे, अवधूत कुंभार, अक्षय पाटील, दिनेश शर्मा यांच्यासह आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलिस विभाग व वाहतूक शाखेचे कर्मचारी, वाहन विक्रेते आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

