(मुंबई)
केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अग्निवीरांची सैन्यसेवा संपल्यानंतर त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी उपाययोजना सुचविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे.
सदर अभ्यासगट पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आला असून, या समितीला सविस्तर अभ्यास करून तीन महिन्यांच्या आत शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अग्निवीर योजनेनंतर रोजगाराचा प्रश्न
अग्निवीर योजनेमुळे तरुणांना चार वर्षांसाठी भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी मिळते. मात्र सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातून या योजनेच्या पहिल्या तुकडीत 2,839 अग्निवीर सहभागी झाले होते. या अग्निवीरांची चार वर्षांची सेवा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. योजनेनुसार 25 टक्के अग्निवीरांना सैन्यदलात नियमित सेवा मिळणार असून उर्वरित 75 टक्के अग्निवीरांसाठी राज्यस्तरीय रोजगार संधी निर्माण करण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे.
पोलीस, वनविभाग, अग्निशमन दलात संधी देण्याचा विचार
उर्वरित अग्निवीरांना पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या शासकीय सेवांमध्ये सामावून घेतल्यास त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि शिस्तीचा लाभ राज्याला होऊ शकतो. याच उद्देशाने हा अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला आहे.
अभ्यासगटातील सदस्य
या समितीत स्क्वॉड्रन लीडर (नि.) विद्यासागर कोरडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर सईदा फिरासत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, लेफ्टनंट जनरल (नि.) आर. आर. निंभोरकर, एअर मार्शल (नि.) नितीन शंकर वैद्य, रिअर ॲडमिरल (नि.) आशिष कुलकर्णी आदी मान्यवरांचा समावेश आहे: या समितीचे सदस्य सचिव म्हणून पुणे सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक निवृत्त लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले काम पाहणार आहेत.
या अभ्यासगटाच्या शिफारशींमुळे राज्यातील हजारो अग्निवीरांच्या भविष्यातील रोजगाराचा मार्ग सुकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

