भारतासाठी एक अत्यंत आनंददायक आणि ऐतिहासिक क्षण समोर आला आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली असून, जागतिक पातळीवर भारताची घोडदौड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
भारताची ४ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल
नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या दहाव्या बैठकीनंतर बोलताना बी. व्ही. आर. सुब्रमण्यम म्हणाले, “आज आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार भारताने जपानलाही मागे टाकले आहे. आपल्यापुढे सध्या केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी यांच्या अर्थव्यवस्था आहेत. मात्र मला विश्वास आहे की येत्या काही वर्षांत आपण जर्मनीलाही मागे टाकू.”
तीन वर्षांत भारत होईल तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था?
सीईओ सुब्रमण्यम यांनी यावेळी एक महत्वाचा दावा करताना सांगितले की, “आम्ही आमच्या योजनांवर ठाम आहोत. जर सर्व काही नियोजनानुसार घडले, तर पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ अस्थिर असताना भारताने ही कामगिरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही भारताच्या प्रगतीला रोखू शकले नाहीत,” असेही ते म्हणाले.
Apple iPhone उत्पादनाविषयी प्रतिक्रिया
Apple iPhone वरील कराबाबत विचारलेल्या प्रश्नावर बी. व्ही. आर. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्हाला आशा आहे की भविष्यात Apple चे iPhone भारतात नव्हे तर थेट अमेरिकेतच तयार होतील. भविष्यातील टॅरिफ काय असतील, हे सांगणे कठीण आहे, पण भारत उत्पादनासाठी एक स्वस्त आणि उपयुक्त पर्याय नक्कीच ठरेल.”
ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. अर्थव्यवस्थेच्या या झपाट्याने होणाऱ्या वाढीने देशाला भविष्यात जागतिक नेतृत्वाच्या दिशेने आणखी पुढे नेले जाईल, यात शंका नाही.

