(मुंबई)
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या दमदार उपस्थितीत बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू होणार असून, यंदा शो अधिक भव्य, अधिक थरारक आणि वेगळ्या संकल्पनेसह सादर होणार आहे.
‘बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…’ हा ओळखीचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील घराघरांत घुमणार आहे. ‘दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!’ या नव्या थीमसह बिग बॉसचं घर नव्या रचनेत आणि नव्या नियमांसह सज्ज झालं आहे.
100 दिवसांचा थरार, 100 हून अधिक कॅमेरे
तब्बल 100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात स्पर्धकांचे विविध रंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अतरंगी स्वभाव, बदलती नाती, मैत्री, प्रेम, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ यामुळे हा सीझन अधिक रंगतदार ठरणार आहे.
रितेश देशमुख पुन्हा सूत्रसंचालक
बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये पुन्हा एकदा रितेश देशमुख सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मागील सीझनमध्ये त्यांनी स्पर्धकांना कधी मित्र, तर कधी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून परखडपणे आरसा दाखवला होता. यंदाही त्यांच्या अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगमुळे खेळाला खास रंग चढणार आहे.
घराची नवी संकल्पना, 16 लोकप्रिय स्पर्धक
यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे बिग बॉसचं घर. सुमारे 13,000 चौरस फूट भव्य जागेत उभारलेलं हे घर नव्या संकल्पनेवर आधारित आहे. मनोरंजन, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील 16 हून अधिक लोकप्रिय व्यक्ती या घरात एकत्र राहून खेळ खेळताना दिसणार आहेत. शो सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर संभाव्य स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. यावेळी फॉरमॅट न बदलता कंटेंट अधिक धारदार ठेवण्यात आला असून, प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे.
प्रसारण
बिग बॉस मराठी सीझन 6 हा शो 11 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. यंदा कोणता स्पर्धक प्रेक्षकांची मनं जिंकणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

