(मुंबई)
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतमोजणीच्या तारखेबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी आज, ५ डिसेंबरला, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीसह सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. या ठिकाणची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती, मात्र सुधारित निवडणूक कार्यक्रमामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. नवीन कार्यक्रमानुसार, २४ नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी, तसेच ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठी मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. या सर्व निवडणुकांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
या निर्णयाविरुद्ध राजकिरण बर्वे आणि एआयएमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी मतमोजणी तात्काळ घेण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. फिरोज शेकूवाले यांनी ही माहिती दिली.
या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाचे भवितव्य या निर्णयावरच अवलंबून राहणार आहे.

