(पनवेल)
जुना मुंबई–पुणे महामार्गावर बारवाईजवळ गुरुवारी (दि. 21) दुपारी एक भीषण अपघात घडला. या अपघातात तब्बल चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळून रस्त्याच्या कडेला फेकली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारवाईजवळील कठीण वळणावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत एक रिक्षा, मारुती इको, हुंदाई कार आणि स्कोडा कारचा समावेश असून, सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य करत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व अपघातग्रस्त वाहनांची नोंद घेतली. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

