(मुंबई)
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर केवळ मैदानावरच नव्हे तर समाजकारणातही पुढाकार घेत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दिल्लीमध्ये त्याने सुरू केलेल्या ‘आशा जन रसोई’ या उपक्रमामुळे हजारो गरीब आणि गरजूंना दररोज फक्त १ रुपयात पौष्टिक आणि पोटभर जेवण मिळत आहे.
या उपक्रमाची सुरुवात गंभीरने आपल्या खासदारकीच्या काळात, २४ डिसेंबर २०२० रोजी गांधीनगर भागातून केली. पहिल्या रसोईला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्याने अल्पावधीतच दुसरी रसोई ९ फेब्रुवारी २०२१ रोजी न्यू अशोक नगर भागात सुरू केली. यानंतर २४ ऑगस्ट २०२१ रोजी ईस्ट विनोद नगर येथे तिसरी रसोई उघडण्यात आली, तर २३ ऑक्टोबर २०२१ रोजी लक्ष्मीनगर-शकरपूर भागात चौथी रसोई सुरू करण्यात आली. या प्रवासात १४ जानेवारी २०२३ रोजी किशन कुंज (लक्ष्मीनगर) येथे पाचव्या रसोईचा शुभारंभ झाला.
या सर्व रसोईंतून दररोज हजारो लोक अल्प दरात पोटभर जेवतात. एका थाळीत भात, डाळ, भाजी आणि सॅलड असा संपूर्ण आहार देण्यात येतो आणि त्यासाठी केवळ १ रुपया आकारला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणी रोज किमान हजारो गरजूंना स्वस्त दरात पण पौष्टिक आहार मिळतो.

