(पुणे)
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
एकमताने निवड
साहित्य महामंडळाची बैठक पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत, अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
प्रा. जोशी म्हणाले, “घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविले होते. शाहूपुरी शाखेकडून आयोजन असल्याने पुणे साहित्य परिषदेने अध्यक्षपदासाठी कोणतेही नाव सुचवले नव्हते. मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी केलेले त्यांचे योगदान लक्षात घेऊन, एकमताने त्यांची निवड करण्यात आली आहे.” हे संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे.
दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी
उद्घाटनाच्या आदल्या दिवशी ग्रंथदिंडी निघणार असून दुपारी ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि बालकुमारांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकांवरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, तसेच नामवंत कादंबरीकारांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. या वेळी प्रथमच सर्व पूर्वाध्यक्ष, सरस्वती सन्मानप्राप्त लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
साताऱ्यातील चौथे संमेलन
साताऱ्यात हे संमेलन चौथ्यांदा होत आहे. याआधी १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली, १९६२ साली न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली, तर १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली येथे संमेलन झाले होते.
शाहू स्टेडियमची सुविधा
छत्रपती शाहू स्टेडियम हे १४ एकरात पसरलेले असून तेथे मुख्य मंडप, उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी–गझल कट्टा, भोजन व्यवस्था आणि इतर कार्यक्रमांसाठी तीन स्वतंत्र सभागृहे उपलब्ध आहेत. २५,००० क्षमतेची गॅलरी असलेले हे स्टेडियम सातारा बसस्थानकापासून अगदी जवळ आहे. पार्किंगसाठी पोलीस परेड ग्राउंडची ८ एकर जागा वापरण्यात येणार आहे.

