(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय संन्यासाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आता घरी बसायचं ठरवलं आहे. दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्यभरे,” असे भावूक वक्तव्य त्यांनी केले. कणकवली येथे झालेल्या राणे समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पुढील काळात विकासात्मक राजकारण निलेश राणे आणि नितेश राणे करतील, असे सांगत कार्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
३६ वर्षांचा राजकीय प्रवास आणि भावनिक क्षण
सिंधुदुर्गात झालेल्या जाहीर सत्कार समारंभात बोलताना नारायण राणे म्हणाले, “आज राजकारणात ३६ वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत मी पैसे देऊन लोकांना सभेला बोलावले नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी कधी पैशासाठी साथ दिली नाही.” कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
“कधीतरी थांबायला हवे”
वय वाढत चालले असून शरीरही थकते आहे. दोन्ही मुले राजकारणात स्थिर झाल्यानंतर आता व्यवसायाकडे कुणीतरी लक्ष दिले पाहिजे, असे सांगत राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले. “राजकारणात कटकारस्थानं होतात. त्यामुळे ठरवलं आहे, आता घरी बसायचं,” असेही ते म्हणाले. “माझ्यानंतर निलेश आणि नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. त्यांनी हाक दिली तर ओ द्या,” असे आवाहन करत त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचा संदेश दिला. “पैशासाठी राजकारण करू नका. असे पैसे पचत नाहीत,” असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले.
कोकणासाठी केलेल्या कामांचा आढावा
आपल्या भाषणात नारायण राणे यांनी कोकणातील विकासकामांचा उल्लेख केला. “१९९० साली कोकणात आलो तेव्हा पाणी, रस्ते नव्हते. आज वाड्यावाड्यांत डांबरी रस्ते आहेत. २८ पूल, रुग्णालये, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या,” असे त्यांनी सांगितले. जात, धर्म किंवा पक्ष न पाहता काम केल्याचा दावाही त्यांनी केला.
“माणुसकी हा माझा धर्म”
“आजही मी रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे,” असे सांगत त्यांनी साधेपणावर भर दिला. द्वेषाचे राजकारण टाळण्याचा सल्ला देत, “पक्ष सांभाळा, स्वार्थ नको,” असेही ते म्हणाले. आपल्या कारकिर्दीतील संघर्ष, यश आणि अनुभव सांगताना राणे म्हणाले की, “मी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे मिळाली, पण स्वार्थासाठी राजकारण केले नाही.” कोकणाच्या जनतेमुळेच हे सर्व शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या सक्रिय राजकारणाच्या भविष्यातील भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

