( पुणे )
पुण्यातील पिंपळे निलख परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक कचऱ्यात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अर्भक ताब्यात घेतले. डॉक्टरांनी तपासणीनंतर अर्भकाचा मृत्यू आधीच झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी अर्भक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात महिलेकडून नवजात अर्भक कचऱ्यात फेकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. ही बाब समोर येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अर्भक कुणी, केव्हा आणि कोणत्या कारणामुळे कचऱ्यात फेकले, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, परिसरातील रुग्णालये, खासगी दवाखाने व महिला आरोग्य केंद्रांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासात अर्भक जन्मानंतर काही तासांतच मृत झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, ही घटना आजही समाजात मुलगी नकोशी असल्याची विकृत मानसिकता कायम असल्याचे अधोरेखित करते. स्त्री भ्रूण हत्या, नवजात अर्भकांची हत्या यांसारख्या घटनांमुळे समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील मानसिकता बदलण्याची गरज पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती देत तपासात सहकार्य केले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत असून, अर्भक कचऱ्यात फेकणाऱ्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

