(दापोली)
दापोली तालुक्यातील सारंग परिसरात एका ४० वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन-तीन दिवस घरात लाईट न दिसल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी घराची चौकशी केली असता भयावह वास्तव उघड झाले. मृत व्यक्तीची ओळख रुपेश दामु मोहीते (वय ४०, रा. सारंग बौद्धवाडी) असे करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी सांगितले की, रुपेश गेली दोन-तीन दिवस घरात एकटाच होता. घरात लाईट न लागल्याचे लक्षात येताच नातेवाईक व गावातील मित्रांनी रुपेशच्या घरी पाहणी करण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडल्यावर हॉलशेजारील खोलीत लाकडी शिडी आणि छताच्या लोखंडी अँगलला बांधलेली नायलॉनची दोरी दिसली, ज्यावरून त्याने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामस्थांनी तातडीने रुपेशला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले, परंतु वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुचिता संतोष पेंढारी यांनी दापोली पोलिसांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आत्महत्येच्या कारणांबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु प्राथमिक तपासात कौटुंबिक वादामुळे हा निर्णय घेतला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटना घडत असताना रुपेश एकटाच होता, त्याची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती तर आई मुंबईतील बहिणीकडे होती. उत्कृष्ट गवंडी म्हणून ओळख असलेल्या रुपेशच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

