(राजापूर / तुषार पाचलकर)
३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नेपाळ येथे होणाऱ्या इंडो नेपाळ आंतर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याची राजापूर तालुक्यातील सरस्वती मंदिर पाचल हायस्कुल ची खेळाडू सेजल अनंत गुरव हिची भारतीय संघात निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्रासाठी तसेच रत्नागिरी जिल्ह्या आणि राजापूर तालुक्यासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव मोहम्मद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असून, सेजल गुरव टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन राजापूरकडून खेळत रत्नागिरी व महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. तिची निवड आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर करण्यात आली आहे.
सेजलच्या या यशामागे युवराज मोरे, डॉ.योगिता खाडे आयरे, शैलेन्द्र बनसोडे आणि प्रवीण किंजळस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि सेजलच्या मेहनतीमुळे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान तिला मिळाला असल्याचे क्रीडाप्रेमींमधून सांगितले जात आहे.
या उल्लेखनीय निवडीबद्दल रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुरेश मयेकर, उपाध्यक्ष खालिद भाई दलवाई व मंगेश माटे, तसेच ॲड.संकेत साळवी, ओमकार संसारे आणि संकेत शिंदे यांनी सेजल कालेकर हिचे अभिनंदन करून तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सेजल गुरव हिच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात आणखी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

