(पालघर)
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंगळवारी फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंसाई गावात दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये भावेश वावरे (३५) आणि मोनिका पाडवले (३०) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये मोनिका जाधव, जागृती गवते, प्रतिभा पवार आणि मोनिका वर्दी यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एका जुन्या शेतघरातील पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. स्फोटाच्या वेळी सुमारे ३० ते ३५ कामगार कामावर होते, त्यात महिलांचा मोठा सहभाग होते आणि ते फटाके बनवण्यात व्यस्त होते. रासायनिक मिश्रण तयार करत असतानाच अचानक स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारांसाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.
स्फोटानंतर घटनास्थळी आग भडकली होती. अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग आटोक्यात आणली. स्फोट इतका शक्तिशाली होता की शेड कोसळून त्याचे तुकडे परिसरात विखुरले गेले. काही अंतरावर मृतांचे अवयव सापडल्याने स्फोटाची तीव्रता स्पष्ट झाली असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधित कारखाना बेकायदेशीरपणे चालवला जात होता का, तसेच आवश्यक परवाने आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, वाडा तालुक्यात अशा अनेक बेकायदेशीर फटाका कारखाने सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन अशा धोकादायक कारखान्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय ‘सुतळी बॉम्ब’सारखे घातक फटाके तयार केले जात असल्याने कामगारांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या भीषण घटनेनंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

