(चिपळूण)
चिपळूण नगर परिषदेची नव्याने बांधलेली पण कालांतराने जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी आधुनिक व सुसज्ज नवी इमारत उभारली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्णयानुसार गुरुवारी जुन्या इमारतीच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली.
या पाडकामाच्या शुभारंभप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी विशाल भोसले, तसेच चिपळूण नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
नवीन नगर परिषद इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नगराध्यक्ष म्हणून उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. उर्वरित निधीही लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर संपूर्ण क्षमतेने बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले असून लवकरच चिपळूण शहराला आधुनिक, प्रशस्त व नागरिकाभिमुख अशी नवी नगर परिषद इमारत मिळणार आहे.
पाडकामाच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, शिवसेना शहराध्यक्ष प्राजक्ता टकले, ठेकेदार प्रकाश पवार यांच्यासह नगरसेवक सोनल जंगम, निशांत जंगम, धीरज नलावडे, भाऊ भाटकर, मिस्बाह नाखुदा, उदय जुवळे, सफा गोठे, साजिद सरगुरोह, रूपाली दांडेकर, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, वैशाली कदम, निहारबीकोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, अंकुश आवले, उमा उर्फ शिल्पा देसाई, शुभम पिसे, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे, मिथिलेश (विकी) नरळकर यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूण शहराच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम करण्यासाठी ही नवी इमारत महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांनाही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

