( साखरपा / भरत माने )
कोंडगाव (साखरपा) येथील तरुण विवेक (विकी) गुरूपादगोळ यांनी साखरपा ते नेपाळ असा सुमारे ५४०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय बाईक रायडिंग प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. व्यवसाय सांभाळत आपल्या छंदाला शिस्तबद्ध प्रयत्नांची जोड देत त्यांनी हे आव्हान पूर्ण केल्याने साखरपा परिसरात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. साखरपा बाजारपेठेत किराणा दुकान चालवणारे विवेक यांनी १२ डिसेंबर रोजी प्रवासास सुरुवात केली. साखरपा – मुंबई – इंदूर – कानपूर – नेपाळ – बुटवाल असा प्रवास करून २४ डिसेंबर रोजी साखरप्यात परत आले. अवघ्या दहा दिवसांत त्यांनी हा दीर्घ टप्पा पूर्ण केला.
दररोज पहाटे ५ ते सायंकाळी ७ या कालावधीत सरासरी ६५० ते ७०० किमी अंतर पार करत त्यांनी प्रवास केला. हिमालयन बाईकने हा दौरा पूर्ण झाला असून बाईकची उत्तम साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत कोल्हापूर येथील जयदीप नाळे हे त्यांचे सहप्रवासी होते.
यापूर्वीही विवेक यांनी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लेह-लडाख, कन्याकुमारी अशा ठिकाणी सुमारे ७ हजार किमीपेक्षा जास्त बाईक ट्रेक पूर्ण केले आहेत. “व्यवसाय सांभाळून वर्षातून एकदा तरी वेगळे साहस करायचे” हा त्यांचा ठाम संकल्प आहे.
कुटुंबियांचा पाठिंबा व नियोजनबद्ध तयारीमुळे हे प्रवास सुरक्षित पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हिमाचल प्रदेशातील ‘स्पीती व्हॅली’ हा अत्यंत कठीण ट्रेक पूर्ण करण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन रायडर्ससाठी संदेश देताना विवेक म्हणाले की, सुरक्षा साधने, योग्य गियर, वेगमर्यादा आणि शिस्त याकडे दुर्लक्ष करू नये. साहस म्हणजे अतिरेक नव्हे. तरुण वयात प्रवास करा, पण जबाबदारीने करा, असे आवाहन त्यांनी केले.

