(चिपळूण)
रत्नागिरी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या २ वर्षे ३ महिन्यांच्या समर्था रुचिरा साईप्रसाद साळवी हिने पाच वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन व ऍक्वा टेकनिकस स्विमिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप (चिपळूण) येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील समर्था साळवी हिने आपल्या वयाच्या कितीतरी पटीने मोठ्या स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांपासून ती सातत्याने जलतरण सराव करत असून तिला स्विमिंग कोच विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
समर्था ही गुहागर–गिमवी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक महादेव सिताराम जाधव यांची पणती असून राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त निरीक्षक सुभाष जाधव यांची नात आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून कुटुंबीयांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

