(खेड)
खेड तालुक्यातील आंबडस बसस्टॉपजवळ सोमवारी (२९ डिसेंबर) मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत एका जीपमधून सुरू असलेली विनापरवाना गुरांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार बैल व वाहतूक करणारी बोलेरो जीप असा सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणात संजू राजू साळुंखे (३१, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली), रोहन अंकुश साळुंखे (२१, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली) आणि संजय गंगाराम चव्हाण (३४, रा. आंबडस बसस्टॉपजवळ, ता. खेड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. येथील पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल अशोक विठ्ठल मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासणीदरम्यान (एमएच-५०, एन-५४७६) क्रमांकाच्या बोलेरो जीपमधून चार लहान-मोठे बैल वाहून नेले जात असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता संबंधितांकडे गुरांच्या वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबडस परिसरातून हे बैल जीपच्या हौद्यातून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या नेले जात होते. या प्रकरणी आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत कलम ५ (अ) (१) चे उल्लंघन, तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १९२ (अ), ३ (१८१), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

