(ठाणे)
नौपाड्यातील बेकायदा गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह डाटा ऑपरेटर ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे यांनाही तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. शिंदे यांच्या न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान तिघांच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, त्या अर्जावर बुधवारी (८ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.
१ ऑक्टोबर रोजी उपायुक्त शंकर पाटोळे आणि ओमकार गायकर या दोघांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, सुशांत सुर्वे याला अटक झाल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. सोमवारी तिघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायाधीश एस.एस. शिंदे यांनी कोणताही विलंब न करता तिघांनाही दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या वेळी सरकारी बाजूने ठाणे जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे तर बचाव पक्षाकडून वकील विशाल भानुशाली यांनी हजेरी लावली. भानुशाली यांनी आजच (मंगळवारी) सुनावणी घेण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने सुनावणी बुधवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.

