(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई- गोवा महामार्गावर कार्यरत असलेल्या हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्राच्या (टॅब) पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केसेस दाखल करण्याच्या नावाखाली पर्यटकांच्या गाड्या अडवून पैसे उकळले जात असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. हातखंबा टॅबवर नवे अधिकारी रुजू झाल्यापासून आडमार्गे जाऊन पावत्या फाडण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा सर्वसामान्य वाहनचालकांमध्ये जोर धरू लागली आहे.
सध्या जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे. काही महत्वाच्या मार्गावर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी काही हातखंबा महामार्ग पोलिस कर्मचारी नियमांचा धाक दाखवून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. विशेषतः बाहेरून आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करून दंडात्मक कारवाईचा बागुलबुवा दाखवला जात असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा हप्तेखोरीचा सुसंस्कृत पण उघड गुप्त व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. ओव्हरलोड वाहतूक, वडाप व्यवसायसह विविध गैरप्रकारांतून मोठ्या प्रमाणावर ‘सेटिंग’ सुरू असल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस दलाचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचे चित्र आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अपघात रोखणे आणि गरजूंना तातडीची मदत पुरवून वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखणे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी या जबाबदाऱ्यांऐवजी दंड, पावत्या आणि वसुली यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे समोर येत आहेत. महामार्गावरील अवघड वळणांजवळ, झाडांच्या आडोशाला पोलिस वाहन उभे करून वाहनचालकांना अचानक अडवण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करून नियमांचा धाक दाखवला जातो आणि त्यातूनच वाहनचालकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप आहे. ही पद्धत सुरक्षा नव्हे, तर सापळा ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकारांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासकीय वाहनांच्या वापरावर नियंत्रण, अचानक तपासणी, तसेच ठरावीक ठिकाणी होणाऱ्या अशा कारवायांची सखोल चौकशी केल्याशिवाय या गैरप्रकारांना आळा बसणार नाही. अन्यथा ‘पाहणी’ हा शब्दच नागरिकांसाठी भीतीचा समानार्थी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारांकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
पर्यटक आणि बाहेरगावच्या वाहनांना लक्ष्य?
आंबा घाट, बावनदी, मासेबाव, निवळी घाट, देवधे–दाभोळे, करंजारी आदी काही ठराविक ठिकाणीच ट्रॅफिक पोलिस ठाण मांडून उभे राहत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ही ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नव्हे, तर वाहनचालकांना अडवणे सोपे जाईल अशा दृष्टीने निवडली गेल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या ठिकाणी स्थानिक वाहनचालकांपेक्षा बाहेरून आलेले पर्यटक आणि परजिल्ह्यातील वाहनचालक अधिक प्रमाणात अडवले जात असल्याचेही बोलले जात आहे. नियमांची भीती, वेळेचा ताण आणि अपरिचित परिसर याचा गैरफायदा घेतला जात असल्याची भावना वाढत चालली आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या प्रतिमेलाच धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमप्लेट झाकण्यासाठी जॅकेटचा वापर?
महामार्गावर कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट दिसणे हे पारदर्शकतेचे आणि जबाबदारीचे मूलभूत लक्षण आहे. मात्र काही ठिकाणी रात्री वापरायच्या हिरव्या व लाल रंगाच्या रिफ्लेक्टर जॅकेटऐवजी दिवसा वापरण्यात येणाऱ्या जॅकेटचा वापर जाणूनबुजून केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, या जॅकेटमुळे छातीवरील नेमप्लेट स्पष्टपणे दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांची ओळख लपवली जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

