(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल येथील दिक्षा भूमी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमात पतसंस्थेचे चेअरमन आयु. सी. बी. जाधव तसेच उपाध्यक्ष आयु. प्रकाश पांगरीकर यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पतसंस्थेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे तज्ञ संचालक आयु. अनिल पाटणकर, संचालक आयु. प्रमोद जाधव, तज्ञ संचालिका सौ. मंगल कांबळे, हिशेब तपासणीस आयु. रमेश चापले, सचिव साहील बने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सभासदांमध्ये सिताराम जाधव, विजयकुमार कांबळे, दामाजी पांचाळ, सौ. सुषमा जाधव, सौ. प्रज्ञा जाधव, सौ. सुमन जाधव, सौ. सुनिता माने आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनदर्शिकेमध्ये राष्ट्रीय थोर व्यक्तींचे विचार, सामाजिक संदेश, तसेच संस्थेच्या कार्याची माहिती समाविष्ट करण्यात आली असून ती सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बळ देण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सचिव व कर्मचाऱ्यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

