(जैतापूर / वार्ताहर)
भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार, नागरी संरक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने आणि उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित “क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिराचा” समारोप सोमवारी जैतापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
हे प्रशिक्षण शिबिर दि. ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत काझी मल्टीपर्पज हॉल, जैतापूर येथे पार पडले. संपूर्ण शिबिराचे आयोजन जिल्हा उपनियंत्रक अधिकारी ले. कर्नल प्रशांत चतुर (से.नि.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या शिबिरात जैतापूर, नाटे, मोगरे, दळे आणि परिसरातील अनेक स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान नागरी संरक्षण दलाची मूलभूत तत्त्वे, आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण, सी.पी.आर., जैविक–रासायनिक–परमाणू सुरक्षा, प्रथमोपचार, स्वबचाव कार्य आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचे संरक्षण या विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी आणि मास्टर ट्रेनर अक्षय जाधव यांनी केले. दोन्ही प्रशिक्षकांनी स्वयंसेवकांना वास्तव परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि शिस्तीचे प्रशिक्षण दिले. समारोप समारंभात प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव कथन करत नागरी संरक्षण दलाच्या कार्याची महत्त्वपूर्ण जाण आणि आपत्तीच्या वेळी तत्परतेने सेवा देण्याची तयारी व्यक्त केली.
या समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सागरी पोलिस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश रूमडे, प्रशिक्षक आननसिंग गढरी, अक्षय जाधव, जैतापूर ग्रामपंचायत उपसरपंच मीनल मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडवीरकर, सिकंदर करगुटकर, रुपेश करगुटकर, ग्रुप ग्रामपंचायत दळे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष जब्बार काझी, त्रिवेणी महिला फेडरेशन सहसचिव सौ. रेशम लाड, सौ. मनीषा पाटील, पत्रकार राजन लाड, तसेच माजी उपसरपंच प्रसाद मांजरेकर हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरासाठी जैतापूर ग्रामपंचायत तसेच नाटे ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी जब्बार काझी आणि बंधू यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला, याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमाला चारुदत्त मांजरेकर यांचेही सहकार्य लाभले, तसेच राजापूर नगरपरिषद यांनी देखील शिबिराच्या आयोजनासाठी आवश्यक सहकार्य केले.
या क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षणामुळे स्थानिक युवक आणि स्वयंसेवकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षमतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची मानसिक व शारीरिक तयारी निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले. “आपत्ती व्यवस्थापन ही फक्त जबाबदारी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सजगता आणि सामाजिक बांधिलकी आहे” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

