(मुंबई)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली आहे.
विवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. तोपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार MPSC सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विवेक भीमनवार हे 2009 बॅचचे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी HSRP नंबर प्लेट, अपघातमुक्त प्रवास, रस्ते सुरक्षा यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या. तसेच ते वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणूनही कार्यरत होते.
भीमनवार मूळचे विक्रीकर विभागातील अधिकारी असून त्यांनी विक्रीकर सहआयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. कर प्रणालीचे संगणकीकरण, व्हॅटची अंमलबजावणी आणि GST (वस्तू व सेवा कर) लागू करताना त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
ठाणे जिल्ह्यातील कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेत राज्यात प्रथम क्रमांक, तसेच डिजिटल शाळा अभियानासाठी राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार योजना, नळपाणी पुरवठा योजना, टँकरमुक्त गावे यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत त्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि आरोग्य समस्यांवर मात केली होती.
जलयुक्त शिवार योजनेत 145 कामे पूर्ण, 126 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली, तर 13 गावे टँकरमुक्त करण्यात आली. याचा लाभ सुमारे 10 हजार नागरिकांना झाला. खर्डी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून महिलांचा पाण्यासाठी करावा लागणारा धोकादायक प्रवास थांबवण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

