(मुंबई)
महाराष्ट्रात एकूण ₹34,000 कोटींची भव्य औद्योगिक महागुंतवणूक होणार असून, त्यातून राज्यात जवळपास 33,000 नवीन रोजगार संधी निर्माण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज 17 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले.
या गुंतवणुकीमुळे पुणे, नाशिक, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागात उद्योग उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स, संरक्षण उद्योग तसेच इतर संबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.
यापैकी मे. युरोबस भारत प्रा. लि. ही कंपनी पुणे जिल्ह्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक बसेसची निर्मिती करणार आहे. कंपनी याठिकाणी ४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून १२ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कंपनीचे प्रतिनिधी श्री. पीटर हार्टमॅन, श्री. अमेय जोशी आणि डॉ. सचिन काटे यांनी सदिच्छा भेट घेत बसची प्रतिकृती भेट म्हणून दिली.
‘फक्त करार नव्हे, अंमलबजावणीही ठाम’
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सुलभ आणि अडथळारहित अनुभव मिळावा यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. आम्ही केवळ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर शासन भागीदार म्हणून सक्रिय राहील.”
राज्यात अलीकडेच पाच वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी वीजदरात होणारी ९% वाढ थांबवली जाईल आणि त्याऐवजी दर हळूहळू कमी होतील. त्यामुळे उद्योगांना दीर्घकालीन स्थैर्य व आर्थिक लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने गुंतवणुकीच्या जीवनचक्रात स्थिरता आणि पारदर्शकता ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होईल. ‘मैत्री पोर्टल’ च्या माध्यमातून जमीन, परवानग्या आणि विविध मंजुरी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास सर्व स्तरांवरून व्यक्त करण्यात आला.

