(कोल्हापूर)
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना, काल सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याद्या जाहीर होताच राज्यभरात नाराजीनाट्य, पक्षांतर आणि बंडखोरी सुरू झाली असून, कोल्हापूरमध्ये या नाराजीला टोकाचं वळण मिळालं आहे.
भाजप महिला नेत्या आत्मदहनाच्या पवित्र्यात
भाजपच्या कोल्हापूर महानगर सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांनी तिकीट नाकारल्याने पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात पक्षाला लेखी पत्र दिलं असून, आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरवत उमेदवारी नाकारल्याचा आरोप केला आहे.
पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, पतीच्या निधनानंतरही स्वतःला सावरत त्यांनी पक्षकार्य अखंडित ठेवलं. “पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा बैठक चुकवली नाही. मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. मात्र आज आर्थिक परिस्थिती कारण देत मला तिकीट नाकारण्यात आलं आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक तिरंगी
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि राजर्षी शाहू महाराज आघाडी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. तरीही प्रमुख लढत ही काँग्रेस विरुद्ध महायुती अशीच असणार असल्याचं चित्र आहे.
काँग्रेसने ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती करत आपली बाजू मजबूत केली आहे. ठाकरे सेनेला केवळ 7 जागा देण्यात आल्या असून, शहरातील संघटनात्मक मर्यादा हे त्यामागील प्रमुख कारण मानलं जात आहे. काँग्रेसने सलग दोन दिवसांत 62 उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे.
महायुतीत तडजोड, तरीही नाराजी
महायुतीत जागावाटपावरून तब्बल 6 दिवस तीव्र रस्सीखेच सुरू होती. अखेर चर्चेनंतर भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. राष्ट्रवादी 20 जागांवर ठाम होती, तर शिवसेनेच्या काही नेत्यांनीही अधिक जागांची मागणी केली होती.
अखेर तडजोड झाली असली, तरी सर्व इच्छुकांना न्याय देता न आल्याने महायुतीतील अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून, काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रंगत वाढली आहे.

