(मुंबई/नवी दिल्ली)
शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असतानाच ठाकरे गटाला आणखी एका संभाव्य फुटीचा सामना करावा लागत असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याची चर्चा सुरू असली, तरी या बंडात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबईचे खासदार संजय दिना पाटील सहभागी आहेत की नाहीत, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, स्वतंत्र गटाच्या पत्रावर या दोन्ही खासदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कथित बंडाला आवश्यक असलेला दोन-तृतीयांश पाठिंबा मिळाला आहे का, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक बोलावली असून सर्व ९ खासदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, ९ पैकी ५ खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. यानंतर मंगळवारी ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त समोर आले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीत पोहोचले. स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, ओमराजे निंबाळकर यांनी आपण दिल्लीत गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर संजय दिना पाटील यांच्याबाबतही वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे ९ पैकी किमान ६ खासदारांनी अधिकृतपणे स्वतंत्र गटात सहभागी होणे आवश्यक ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, असे संकेत शिंदे गटातील सूत्रांनी दिले आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतर नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत कोणत्याही नव्या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही ठाकरे गटाने दर्शविली आहे.
आता गुरुवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत किती खासदार उपस्थित राहतात आणि कथित बंडखोर खासदारांची भूमिका काय असते, यावर ठाकरे गटातील या नव्या राजकीय घडामोडींचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

